Thursday, July 3, 2014

पाऊस आठवणीतला…




      एकदाच ढगाला पाझर फुटलं… बाल्कनीतून चिल्ल्या-पिल्ल्यांना पावसात भिजताना पाहून लहानपण आठवलं… पूर्वी शाळेला सुट्टी लागली की आमची वारी गावी असायची पार पाऊस सुरु होई पर्यंत गावात राहायचो…धिंगाणा घालयचो… मुंबई पासून अवघ्या साडे तीन तासांवर असणाऱ्या आमच्या गावाने सुदैवाने 'गावपण ' जपलय…. 
    
      मोठी कौलारू घरं… शेणाने सारवलेल्या जमिनी, घरापुढे अंगण, तेही शेणाने सारवून रांगोळीची नक्षी ल्यालेलं… खूप झाडं… शेतातून जाणारी पायवाट… गावाचं राखीव धरण… आणि ज्यामुळे गावाला 'उन्हेरे' अस नाव पडलं,ते गरम पाण्याचे झरे - कुंड….

                                               

      अशा निसर्गरम्य गावातला 'पहिला पाऊस' ही तितकाच निसर्गरम्य… बरेचदा अनुभवलाय तो पण… सोसाट्याचा वारा… वीज कडाडण… ढगांच गडगडण… गावची वीज जाणं आणि आंब्याच्या झाडांवर तग धरून राहिलेले पुरते पिकलेले  आंबे  वाऱ्याने धपाधप पडण… अगदी असाच असायचा पहिला पाऊस… दरवेळी!!




  
                                                                                        
        



      वारा सुटू लागल्यावर आम्ही लहान मुलं ते परसात पडलेले आंबे वेचण्याच्या निमित्ताने मनसोक्त भिजत असू… अनवाणी पायाने चिखल तुडवत  जास्तीत जास्त आंबे गोळा  करण्याची शर्यत लागायची विनाकारण…  

      आणि अशाच पहिल्या पावसाच्या वेळी दोनदा गारपीट पण अनुभवली… तेव्हाची गारपीट तशी शहाणी होती… ऋतू नुसारच व्हायची… अवकाळी बरसण तिच्या गावी नव्हत म्हणूनच ती सुखदही होती… 

      उन्हाळ्यात गंमत म्हणून आजी - काकू सोबत मेहनतीने  सारवलेल अंगण पावसाच्या सरींनी उखणायच आणि चिखल बनून जायचं तेव्हा कुठेतरी पावसाचा किंचित राग यायचा… अंगण सारावण्याच्या मेहनतीवर खऱ्या अर्थाने 'पाणी फिरवल' म्हणून!



                          


      आज त्या लहानग्यांना खड्डे पडलेल्या डांबरी रस्त्यांवर भिजताना पाहून खूप ठळकपणे आठवलं आणि जाणवलं ते स्वतःच निसर्गाच्या खूप जवळ असलेल बालपण! शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि स्वतःच  गाव असलेल्या प्रत्येकाने हा असा पहिला पाऊस नक्कीच अनुभवला असेल… आठवणींच्या कोपऱ्यात जपला असेल… 

  आजोबांसोबत शेतात इवल्या हातांनी राबून त्यांना इवलीशी मदत करणाऱ्या स्वतःला आठवल कि पावसाची माया ध्यानात येते… निसर्गाचा, पहिल्या पावसाचा असा निर्भेळ आनंद किंबहुना 'सुख' अनुभवण्यासाठीच एका निसर्गरम्य गावातल्या शेतकरी कुटुंबात जन्माला घातलं असाव त्याने… वरुणराजाने….



                          























Friday, March 14, 2014

'R.I.P. Buddhi..... '

                                                                              
    आज खूप दिवसांनी लिहायला बसलेय....काय लिहू ? उमजत नाही....कारण ही तसच आहे म्हणा...हाताला लिहिण्याची आणि मेंदूला विचार करण्याची गेल्या काही दिवसांत सवयच नाही राहिली...म्हणजे Submissions  पुरता लिखाण होतं, तेवढचं...
    काल पासून तशी सवड आहे...म्हणूनच कदाचित आळशीपणाच्या ओझाने गुदमरत जाणारी माझी बुद्धी मला अगतिकतेने मारत असलेल्या हाका....तिच्या आणाभाका मला ऐकू येत आहेत...खूप सारा राग,चिडचिड आवरत...हतबलतेने ती मला सांगू पहातेय.... "अग ए...आवर घाल स्वत:ला,पुर्वीच्या फॉर्मात ये...'R.I.P. बुद्धी म्हणायची वेळ येण्या आधीच मला  विचार आणि कृतीचं ACTIVE ऑक्सिजन दे...
   खरच आहे म्हणा तिचं...म्हणजे busy... busy म्हणजे किती busy असतो आपण...स्वत:च्या सोईनुसार ठरत असत सगळं....जी गोष्ट आपल्याला स्वत:ला मनापासून करायची असते त्यासाठी वेळ...पैसा..श्रम...या तिन्ही गोष्टी सहज manage होतात...किंवा आपण त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो...पण जर ती गोष्ट आपल्याला मनापासून करायची असेल तर आणि तरच...नाहीतर काय हजारो कारण सापडतात....अगदी लहान मुलालाही कळेल की हे निव्वळ कारण आहे...अशी अनेक कारण आपण राजरोसपणे स्वत:ला आणि दुनियेला देत असतो...
   कदाचित विषय भरकटतोय, पण हल्ली मी एखादी गोष्ट न करण्याची एवढी बाळबोध कारण ऐकतेय ना की, चुकूनही अशी कारण सुचणा-या आणि शिताफीने ती इतरांच्या माथी मारणा-या लोकांच्या यादीत मीही जाऊन बसते की काय ? अशी भिती वाटू लागली मला....म्हणूनच कदाचित ऐकू आला असेल माझ्याच बुद्धीचा आवाज मला...तीव्रतेने...आणि तितकीच तीव्र जाणिवही झाली हे महत्वाचं  !!!!
   हुश्श...आत्ता कुठे शांत झाली ही बया....माझी बुद्धी...Finally, आळस झटकलेली मी, पुन्हा तिला I.C.U.ची यात्रा नाही घडवणार...या आशेत, सुखावलेय बिच्चारी...अर्थात माझे प्रयत्नही तेच असतील...या आशेत मी पण जरा सुखावतेय आत्ता !!!!!

Sunday, September 9, 2012

दुःख

मनाच्या कोपऱ्यात
गुपचूप दडलेलं
कोणाला कळूच नये
म्हणून खोलवर कोंडलेल... दुःख!


        सहनशीलतेचा अंत होऊन
        रागात माखलेलं
        डोळ्यांच्या न्हाणीघरात
        आसवांत न्हालेल... दुःख!


स्वप्न म्हणून कुरवाळलेल
वास्तव म्हणून झिडकारलेल
मोहाच्या सापळ्यात
शिकार होऊन अडकलेल... दुःख!


        घाईने निर्णय घेतलेलं
        निर्णय घेण्यात वेळ दवडलेल
        अव्यक्त, अबोल भावनांनी
        उमलण्या पूर्वीच कोमेजलेल... दुःख!


दूरवर पाहता पाहता
जवळच पाहण राहून गेलेलं
सुखाच्या शोधात फिरताना
हातून सुखच अलगद निसटून गेलेलं ... दुःख!


           अपेक्षेने लादलेल
           नैराश्याने फोफावलेल
           आयुष्य संपवण्याचा
          सोपा मार्ग स्वीकारलेल... दुःख!


दारिद्र्याने गांजलेल
भ्रष्टाचाराने पोखरलेल
अस्तित्वाच्या लढाई मध्ये
क्षणोक्षणी हरलेल... दुःख!


            'आहे कि नाही' या
             प्रश्नाच उत्तर होऊ न शकलेल
             मरण नाही म्हणून जगण्याची
             जखम होऊन बसलेलं... दुःख!


प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल
येताना बहुरूपी झालेलं
जाताना जगण  शिकवलेलं... दुःख!
           

Sunday, October 16, 2011

....वेड....शहाणपण शोधण्याच....लिहिण्याचं ......

       आज... आत्ता....मध्यरात्री साधारण १:४५  वाजता  मिणमिणत्या प्रकाशात समोर असलेल्या कोऱ्या कागदावर काहीतरी लिहायला घेतलं...तर काही वेळ काहीच सुचेना....मुळातच समोर पडलेला कोरा कागद भरण्यासाठी काहीतरी लिहावं हेच चुकीच....म्हणजे इतक उदंड डोक्यात साचलं पाहिजे कि कागद दिसताच लिहित सुटावं...किंवा लिहिण्यासाठी कागद शोधला जावा....
       अगदी काहीही....म्हणजे कोणत्याही विषयावर....बाल्कनीत उमललेल्या फूलापासून... ते झाडावरून गळून  पडलेल्या पानापर्यंत...कानाला रिझवणार्या झर्याच्या खळखळाटापासून... ते पाणी टंचाईने बहुतेकदा रिकाम्या राहणाऱ्या भांड्यांच्या खडखडाटापर्यंत....ट्रेनच्या गर्दीपासून.... ते माळरानावरच्या निरव शांतातेपर्यंत....धारावीच्या बकाल वस्तीपासून.... ते फोर्टच्या आलिशान घरापर्यंत.....
        उत्सवाच्या धामधूमीपासून.... ते बॉम्बस्फोटाच्या आक्रोशापर्यंत.....हळुवार जपलेल्या नात्यापासून.... ते ताणून तुटलेल्या नात्यापर्यंत....जागतिक ,... आर्थिक ,नैसर्गिक,...वैज्ञानिक घडामोडींपासून.... ते स्वार्थी,... आत्मकेंद्री,...भावनिक,... नैसर्गिक ,...वैचारिक उलथापालथेपर्यंत.....अगदी कशावरही लिहिता आलं पाहिजे....
        ....कधीही...कसही...कुठेही....खूप जास्त....आणि खूप चांगल लिहिता आलं पाहिजे...आणि याकरता माझ लिहिण्यातल झपाटलेपण वाढलं पाहिजे ....लिहिण्याचं...त्याहीपेक्षा चांगल लिहिण्याचं वेड लागलं पाहिजे....तरच माझ्यातलं लिहिण्याचं काहीस हरवलेलं माझ शहाणपण मला परत सापडेल...

Saturday, September 24, 2011

समांतर

कधीतरी ट्रेनच्या  window seat ला बसून निवांत प्रवास करायला  मिळालाच  तर... आणि खिडकीतून बाहेर पाहत राहील तर ...अंगावर येत या स्वप्न नगरीच दुसर विद्रूप रूप...अठरा विश्व दारिद्र्य.... रेल्वे line ला समांतर आपल्या सोबत चालत राहणारी झोपडपट्टी...मधेच त्यांना हिणवणाऱ्या टोलेजंग इमारती....पण डोळ्यात आणि डोक्यात भरते ती झोपडपट्टीच....कचरा आणि गरीबीच  पसरलेलं भयाण साम्राज्य...त्यातच  खेळणारी... जेवणारी लहान मुलं... मध्येच  कोणत्या तरी झुडपाच्या  आडोशाने drugs घेणाऱ्या तरुणांची चौकड....त्यातच त्यांनी पाळलेले कुत्रा, मांजर, कोंबड्या यांसारखे प्राणी....आणि मधूनच ट्रेनमध्ये कोणीतरी मारलेला शेरा..."यांना स्वतःला  राहायला घर नाही आणि हे प्राणी पाळत आहेत..."
     सगळच अंगावर येणार....खूप तीव्रतेने....आणि तितकाच हळुवार विचार करायला लावणार...स्वतःचा...माणसांचा... समाजाचा...पर्यायी आयुष्याचा....दर दिवशी नव्याने स्वतःच दुःख आधी पेक्षा  अधिक प्रेमाने गोंजारणार्या आपल्या क्षुद्र मनाचा....
      काय असावं त्या झोपडपट्टीतल्या लोकांच आयुष्य??...म्हणजे कोणीतरी जन्माला घातलय आणि मरू शकत नाही म्हणून जगत राहायचं...इतरांची नको असलेली सहानुभूती मिळवत...कोणाच्यातरी रागाचे  नाहक  फटके खात...कोणाच्यातरी वासनेचे बळी होत...जगत राहायचं....आणि असच एक दिवस कोणाला पत्ताही लागता  मरूनही जायचं...खूप  दिवसाचं शिळ अन्न खाल्लं म्हणून.... विषबाधेने...अतीव मारहाणीने...कोणीतरी जबरदस्ती शरीरात  देऊ घातलेल्या असाध्य रोगाने....किंवा  उपचारान  अभावी मरणाचं  कारण ठरलेल्या किरकोळ तापाने....
   जन्म  हातात  नाही आणि मरण हि....कोणाच्याच नसतं.....पण आयुष्य जगण तर हातात  असायला पाहिजे....तेही त्यांना नाही जगता येत....माणूस म्हणून तर नाहीच नाही....शिक्षण...आरोग्य...आनंद...मस्ती...कला....सुख....हे असले शब्द तर त्यांच्या  गावी हि नसतील...जस दरदिवशी जगल  जाणार त्यांच आयुष्य आपल्या गावी नाही....दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही आपल्याला म्हणून आयुष्यावर खूप philosophical बोलत सुटतो आपण....पण खर आयुष्य जवळून हे लोक पाहतात...अनुभवतात....
         यांच्या कडून जगण शिकल पाहिजे....आपण खरच सुखी आहोत हे  स्वतःला पटल पाहिजे.....स्वप्न नागरित  स्वतःच्या  स्वप्नात हरवताना....लाइफ track ला समान्तर चालणार्या या वास्तवाच  भान कायम राहिल पाहिजे....फ़क्त भानच नाही  राहिल पाहिजे तर त्यातून काहीतरी घडल पाहिजे.....सकारात्मक.....निदान स्वतःपुरता तरी.....



Thursday, June 30, 2011

कशासाठी???... पोटासाठी???

    
     संध्याकाळी  साधारण ५.३० -६ ची वेळ …ऑफिसमधून घरी परतण्यासाठी बसमध्ये चढले ..थोड्यावेळातच स्त्रियांकरता राखीव seat वर बसायलाही मिळाले ..driver च्या  मागचीच seat ...१ -२ stop गेले असतील तर पुढच्या दारातून एक गृहस्थ बस मध्ये चढले... अंदाजे वय सांगायचंच झाल तर त्यांनी एव्हाना retire व्हायला पाहिजे होत किंवा ते झालेही असतील...माझ्या शेजारी ते उभे राहिले...
     कोणत्याही पुरुषाने त्यांना बसण्यासाठी जागा दिली  नाही ; अर्थात त्यांनी ती मागितली ही नाही... तसेच एका हातात आपली bag सांभाळत ते उभे होते...मनात असंख्य प्रश्न घेऊन...शरीरात प्रचंड थकवा घेऊन... न राहवून सवयी प्रमाणे मी त्यांना विचारूनच टाकलं..."बसायचं" ???...प्रश्न संपायच्या आत त्यांनी "नाही" सांगून मान फिरवली देखील...मीही मग शांतपणे कधी खिडकीतून बाहेर पाहत तर कधी त्यांचं निरीक्षण करत बसले...पण मनात मात्र अनेक  प्रसंग...आणि प्रश्न यांनी दाटी केली होती...
          प्रवासात असे अनेक लोक दिसतात जे तुम्हा आम्हा सारखेच घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करत असतात...पण फरक एवढाच आपण बहुतेक जण स्वतःच्या इच्छेने हा प्रवास करत असतो....स्वतःसाठी...आणि काही हा प्रवास करत असतात ते त्यांच्याकडे कोणताच पर्याय नसल्यामुळे...पोटासाठी....कुटुंबासाठी...
          का माहित नाही पण अशा माणसांना पाहिलं  की मला माझे बाबा आठवतात...आणि टचकन डोळ्यांत पाणी भरून येत...मी हलकेच पुन्हा त्या गृहस्थांकडे पाहिलं,आता त्यांना बसण्यासाठी जागा मिळाली होती.ते डोळे मिटून बंद करून बसले होते...मी पुन्हा विचारांत गुरफटले गेले...काही दिवसांपूर्वीच असेच एक काका रस्ता ओलांडताना बावरले होते....
           तेव्हाही माझ्या मनात हाच एक प्रश्न आला होता जो आताही येतोय....कशासाठी हे सगळ ???.....घरी बसून आराम करण्याच्या वयात का ही माणस अशी या भयंकर घाईत असलेल्या गर्दीत पळण्याचा प्रयत्न करतात...??? कशासाठी ?? उत्तर एकच...पोटासाठी...
           स्वतःच्याच नाहीतर सबंध कुटुंबाच्या पोटासाठी...सकाळी "आजचा दिवस कसा तरी निभावून ने " अशीच मागणी स्वतःकडे  आणि देवाकडे करत बाहेर पडत असतील असे किती तरी लोक...अंगातला सगळा थकवा बाजूला सारण्याचा किंचित निष्फळ प्रयत्ननात ...अजून थकण्यासाठी...पोटासाठी... 
          घरी बायको नेहमी प्रमाणेच अपेक्षा,चिंता, काळजी, प्रेम, हतबलता या सर्व भावनांचा एकत्रित मार सोसत असेल...सवयीप्रमाणे ... आयुष्यात उमेदीच्या काळात डोळ्यांत रंगवलेल्या स्वप्नांच्या जागी कधी विवंचना भरून राहतात कळतच नाही...आणि मग सुरु होतो जगण्यासाठीचा किचकट प्रवास....माणसांच्या  वाढलेल्या  जंगलात, स्वतःला सावरतानाची होणारी हि नेहमीची कसरत नकोशी वाटत असली तरीही ती नित्यनेमाने करावीच लागते..कशासाठी तर पोटासाठी....
                so called    "Corporate world " च्या व्याखेत ही बसणारे हे लोक रोज नव्याने प्रयत्न करत असतील आपल्या स्वाभिमानी कृतीतून सांगण्याचा कि, "आम्ही ही तुमच्यातलेच आहोत..अजून नाही थकलो आहोत...आम्हाला सहानुभूती  दाखवू नका ...सहकार्य  करा...मागाहून हिणवण्या पेक्षा समोर आल्यावर केवळ अगदी खर  खुर आश्वासक स्मित करा..."
               खरच आयुष्याच्या रहाट गाड्यात  विश्रांतीचे जे काही  क्षण यांच्या वाट्याला येत असतील तेही खर्चाची गोळा बेरीज करण्यातच जात असतील...मुलाच शिक्षण..मुलीचं लग्न..बायकोच दुखण..भावाचा संसार..आई बाबांना आधार...हे सगळाच पहायचं असतं...कितीही दमायला झालं तरीही आयुष्य रेटायच असतं...सगळ्यांना जमेल तितक देत असताना इतरांकडून त्यांची  केवळ अपेक्षा असावी ती म्हणजे त्यांनाही इतरांनी आपल्यात सामावून घेण्याची...
                कदाचित याच भावनेने असेल दररोज रिक्षावाले, बस conductor किंवा रस्ता ओलांडताना भेटलेल्या काकांचा रूपातल्या अश बरयाच लोकांना पाहून अपोआप स्मित उमलत चेहऱ्यावर...त्यना मनोमन सांगणार ..."काका आम्ही ही धावतोय...स्पर्धेत टिकून राहण्यासाठी...आणि पर्यायी तुमच्याच सारख पोटासाठी....


Wednesday, May 4, 2011

आकाशीच्या तारयानो...


   आकाशीच्या तारयानो
   अंगणी माझ्या सांडून जा ना
   जाता जाता आयुष्यावर
   चांदणं पांघरून जा ना...
           कले- कलेनेच वाढत जातो चंद्र
           कले- कलेनेच  दिसेनासा होतो...
          ...अमावसेच्या अंधाराला
           पौर्णिमेचा प्रकाश द्या ना... 
    शांत- गहिऱ्या काळोखाचा
     काळाशार आहे रंग...
 ... रंग छटेच्या गर्ततेचा
    चंदेरी काठ व्हा ना... 
            संथ- वाहत्या प्रवाहाचे
            खोल-खोल अंतरंग...
         ...अंतरंगी स्पर्शून त्याच्या
            पारदर्शी करून जा ना... 
    आकाशीच्या तारयानो
   अंगणी माझ्या सांडून जा ना...