Sunday, October 16, 2011

....वेड....शहाणपण शोधण्याच....लिहिण्याचं ......

       आज... आत्ता....मध्यरात्री साधारण १:४५  वाजता  मिणमिणत्या प्रकाशात समोर असलेल्या कोऱ्या कागदावर काहीतरी लिहायला घेतलं...तर काही वेळ काहीच सुचेना....मुळातच समोर पडलेला कोरा कागद भरण्यासाठी काहीतरी लिहावं हेच चुकीच....म्हणजे इतक उदंड डोक्यात साचलं पाहिजे कि कागद दिसताच लिहित सुटावं...किंवा लिहिण्यासाठी कागद शोधला जावा....
       अगदी काहीही....म्हणजे कोणत्याही विषयावर....बाल्कनीत उमललेल्या फूलापासून... ते झाडावरून गळून  पडलेल्या पानापर्यंत...कानाला रिझवणार्या झर्याच्या खळखळाटापासून... ते पाणी टंचाईने बहुतेकदा रिकाम्या राहणाऱ्या भांड्यांच्या खडखडाटापर्यंत....ट्रेनच्या गर्दीपासून.... ते माळरानावरच्या निरव शांतातेपर्यंत....धारावीच्या बकाल वस्तीपासून.... ते फोर्टच्या आलिशान घरापर्यंत.....
        उत्सवाच्या धामधूमीपासून.... ते बॉम्बस्फोटाच्या आक्रोशापर्यंत.....हळुवार जपलेल्या नात्यापासून.... ते ताणून तुटलेल्या नात्यापर्यंत....जागतिक ,... आर्थिक ,नैसर्गिक,...वैज्ञानिक घडामोडींपासून.... ते स्वार्थी,... आत्मकेंद्री,...भावनिक,... नैसर्गिक ,...वैचारिक उलथापालथेपर्यंत.....अगदी कशावरही लिहिता आलं पाहिजे....
        ....कधीही...कसही...कुठेही....खूप जास्त....आणि खूप चांगल लिहिता आलं पाहिजे...आणि याकरता माझ लिहिण्यातल झपाटलेपण वाढलं पाहिजे ....लिहिण्याचं...त्याहीपेक्षा चांगल लिहिण्याचं वेड लागलं पाहिजे....तरच माझ्यातलं लिहिण्याचं काहीस हरवलेलं माझ शहाणपण मला परत सापडेल...

Saturday, September 24, 2011

समांतर

कधीतरी ट्रेनच्या  window seat ला बसून निवांत प्रवास करायला  मिळालाच  तर... आणि खिडकीतून बाहेर पाहत राहील तर ...अंगावर येत या स्वप्न नगरीच दुसर विद्रूप रूप...अठरा विश्व दारिद्र्य.... रेल्वे line ला समांतर आपल्या सोबत चालत राहणारी झोपडपट्टी...मधेच त्यांना हिणवणाऱ्या टोलेजंग इमारती....पण डोळ्यात आणि डोक्यात भरते ती झोपडपट्टीच....कचरा आणि गरीबीच  पसरलेलं भयाण साम्राज्य...त्यातच  खेळणारी... जेवणारी लहान मुलं... मध्येच  कोणत्या तरी झुडपाच्या  आडोशाने drugs घेणाऱ्या तरुणांची चौकड....त्यातच त्यांनी पाळलेले कुत्रा, मांजर, कोंबड्या यांसारखे प्राणी....आणि मधूनच ट्रेनमध्ये कोणीतरी मारलेला शेरा..."यांना स्वतःला  राहायला घर नाही आणि हे प्राणी पाळत आहेत..."
     सगळच अंगावर येणार....खूप तीव्रतेने....आणि तितकाच हळुवार विचार करायला लावणार...स्वतःचा...माणसांचा... समाजाचा...पर्यायी आयुष्याचा....दर दिवशी नव्याने स्वतःच दुःख आधी पेक्षा  अधिक प्रेमाने गोंजारणार्या आपल्या क्षुद्र मनाचा....
      काय असावं त्या झोपडपट्टीतल्या लोकांच आयुष्य??...म्हणजे कोणीतरी जन्माला घातलय आणि मरू शकत नाही म्हणून जगत राहायचं...इतरांची नको असलेली सहानुभूती मिळवत...कोणाच्यातरी रागाचे  नाहक  फटके खात...कोणाच्यातरी वासनेचे बळी होत...जगत राहायचं....आणि असच एक दिवस कोणाला पत्ताही लागता  मरूनही जायचं...खूप  दिवसाचं शिळ अन्न खाल्लं म्हणून.... विषबाधेने...अतीव मारहाणीने...कोणीतरी जबरदस्ती शरीरात  देऊ घातलेल्या असाध्य रोगाने....किंवा  उपचारान  अभावी मरणाचं  कारण ठरलेल्या किरकोळ तापाने....
   जन्म  हातात  नाही आणि मरण हि....कोणाच्याच नसतं.....पण आयुष्य जगण तर हातात  असायला पाहिजे....तेही त्यांना नाही जगता येत....माणूस म्हणून तर नाहीच नाही....शिक्षण...आरोग्य...आनंद...मस्ती...कला....सुख....हे असले शब्द तर त्यांच्या  गावी हि नसतील...जस दरदिवशी जगल  जाणार त्यांच आयुष्य आपल्या गावी नाही....दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही आपल्याला म्हणून आयुष्यावर खूप philosophical बोलत सुटतो आपण....पण खर आयुष्य जवळून हे लोक पाहतात...अनुभवतात....
         यांच्या कडून जगण शिकल पाहिजे....आपण खरच सुखी आहोत हे  स्वतःला पटल पाहिजे.....स्वप्न नागरित  स्वतःच्या  स्वप्नात हरवताना....लाइफ track ला समान्तर चालणार्या या वास्तवाच  भान कायम राहिल पाहिजे....फ़क्त भानच नाही  राहिल पाहिजे तर त्यातून काहीतरी घडल पाहिजे.....सकारात्मक.....निदान स्वतःपुरता तरी.....



Thursday, June 30, 2011

कशासाठी???... पोटासाठी???

    
     संध्याकाळी  साधारण ५.३० -६ ची वेळ …ऑफिसमधून घरी परतण्यासाठी बसमध्ये चढले ..थोड्यावेळातच स्त्रियांकरता राखीव seat वर बसायलाही मिळाले ..driver च्या  मागचीच seat ...१ -२ stop गेले असतील तर पुढच्या दारातून एक गृहस्थ बस मध्ये चढले... अंदाजे वय सांगायचंच झाल तर त्यांनी एव्हाना retire व्हायला पाहिजे होत किंवा ते झालेही असतील...माझ्या शेजारी ते उभे राहिले...
     कोणत्याही पुरुषाने त्यांना बसण्यासाठी जागा दिली  नाही ; अर्थात त्यांनी ती मागितली ही नाही... तसेच एका हातात आपली bag सांभाळत ते उभे होते...मनात असंख्य प्रश्न घेऊन...शरीरात प्रचंड थकवा घेऊन... न राहवून सवयी प्रमाणे मी त्यांना विचारूनच टाकलं..."बसायचं" ???...प्रश्न संपायच्या आत त्यांनी "नाही" सांगून मान फिरवली देखील...मीही मग शांतपणे कधी खिडकीतून बाहेर पाहत तर कधी त्यांचं निरीक्षण करत बसले...पण मनात मात्र अनेक  प्रसंग...आणि प्रश्न यांनी दाटी केली होती...
          प्रवासात असे अनेक लोक दिसतात जे तुम्हा आम्हा सारखेच घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करत असतात...पण फरक एवढाच आपण बहुतेक जण स्वतःच्या इच्छेने हा प्रवास करत असतो....स्वतःसाठी...आणि काही हा प्रवास करत असतात ते त्यांच्याकडे कोणताच पर्याय नसल्यामुळे...पोटासाठी....कुटुंबासाठी...
          का माहित नाही पण अशा माणसांना पाहिलं  की मला माझे बाबा आठवतात...आणि टचकन डोळ्यांत पाणी भरून येत...मी हलकेच पुन्हा त्या गृहस्थांकडे पाहिलं,आता त्यांना बसण्यासाठी जागा मिळाली होती.ते डोळे मिटून बंद करून बसले होते...मी पुन्हा विचारांत गुरफटले गेले...काही दिवसांपूर्वीच असेच एक काका रस्ता ओलांडताना बावरले होते....
           तेव्हाही माझ्या मनात हाच एक प्रश्न आला होता जो आताही येतोय....कशासाठी हे सगळ ???.....घरी बसून आराम करण्याच्या वयात का ही माणस अशी या भयंकर घाईत असलेल्या गर्दीत पळण्याचा प्रयत्न करतात...??? कशासाठी ?? उत्तर एकच...पोटासाठी...
           स्वतःच्याच नाहीतर सबंध कुटुंबाच्या पोटासाठी...सकाळी "आजचा दिवस कसा तरी निभावून ने " अशीच मागणी स्वतःकडे  आणि देवाकडे करत बाहेर पडत असतील असे किती तरी लोक...अंगातला सगळा थकवा बाजूला सारण्याचा किंचित निष्फळ प्रयत्ननात ...अजून थकण्यासाठी...पोटासाठी... 
          घरी बायको नेहमी प्रमाणेच अपेक्षा,चिंता, काळजी, प्रेम, हतबलता या सर्व भावनांचा एकत्रित मार सोसत असेल...सवयीप्रमाणे ... आयुष्यात उमेदीच्या काळात डोळ्यांत रंगवलेल्या स्वप्नांच्या जागी कधी विवंचना भरून राहतात कळतच नाही...आणि मग सुरु होतो जगण्यासाठीचा किचकट प्रवास....माणसांच्या  वाढलेल्या  जंगलात, स्वतःला सावरतानाची होणारी हि नेहमीची कसरत नकोशी वाटत असली तरीही ती नित्यनेमाने करावीच लागते..कशासाठी तर पोटासाठी....
                so called    "Corporate world " च्या व्याखेत ही बसणारे हे लोक रोज नव्याने प्रयत्न करत असतील आपल्या स्वाभिमानी कृतीतून सांगण्याचा कि, "आम्ही ही तुमच्यातलेच आहोत..अजून नाही थकलो आहोत...आम्हाला सहानुभूती  दाखवू नका ...सहकार्य  करा...मागाहून हिणवण्या पेक्षा समोर आल्यावर केवळ अगदी खर  खुर आश्वासक स्मित करा..."
               खरच आयुष्याच्या रहाट गाड्यात  विश्रांतीचे जे काही  क्षण यांच्या वाट्याला येत असतील तेही खर्चाची गोळा बेरीज करण्यातच जात असतील...मुलाच शिक्षण..मुलीचं लग्न..बायकोच दुखण..भावाचा संसार..आई बाबांना आधार...हे सगळाच पहायचं असतं...कितीही दमायला झालं तरीही आयुष्य रेटायच असतं...सगळ्यांना जमेल तितक देत असताना इतरांकडून त्यांची  केवळ अपेक्षा असावी ती म्हणजे त्यांनाही इतरांनी आपल्यात सामावून घेण्याची...
                कदाचित याच भावनेने असेल दररोज रिक्षावाले, बस conductor किंवा रस्ता ओलांडताना भेटलेल्या काकांचा रूपातल्या अश बरयाच लोकांना पाहून अपोआप स्मित उमलत चेहऱ्यावर...त्यना मनोमन सांगणार ..."काका आम्ही ही धावतोय...स्पर्धेत टिकून राहण्यासाठी...आणि पर्यायी तुमच्याच सारख पोटासाठी....


Wednesday, May 4, 2011

आकाशीच्या तारयानो...


   आकाशीच्या तारयानो
   अंगणी माझ्या सांडून जा ना
   जाता जाता आयुष्यावर
   चांदणं पांघरून जा ना...
           कले- कलेनेच वाढत जातो चंद्र
           कले- कलेनेच  दिसेनासा होतो...
          ...अमावसेच्या अंधाराला
           पौर्णिमेचा प्रकाश द्या ना... 
    शांत- गहिऱ्या काळोखाचा
     काळाशार आहे रंग...
 ... रंग छटेच्या गर्ततेचा
    चंदेरी काठ व्हा ना... 
            संथ- वाहत्या प्रवाहाचे
            खोल-खोल अंतरंग...
         ...अंतरंगी स्पर्शून त्याच्या
            पारदर्शी करून जा ना... 
    आकाशीच्या तारयानो
   अंगणी माझ्या सांडून जा ना...   
  
         
    
           

Wednesday, March 23, 2011





सुखमयी क्षणांची दोन पाखरे
अलगद विसावली खांद्यावर
कुजबुजली हलकेच कानात ,
"भावतं आम्हाला तुझ हास्य ओठांवर..."
          'नेहमी मनभर हसत रहा
          जगण्याच देणं भरभरून लुटत रहा,
          दुःखाचे क्षण  येणारच मार्गी
          त्यांनाही प्रेमाने स्विकारुन पहा..
नकार करणारच पाठलाग तुझा
तू मात्र त्याला घाबरून जाऊ नकोस
त्याच्यापासून  पळण्यापेक्षा 
त्याच्या  समोर धीराने उभी रहा,
           नकारालाही सांग  स्पष्ट 
           मला 'तू' नकोस तर
           तुझा 'होकार' हवा...
सुखाला पैशात मोजू नकोस
सुखाला काळात बांधू नकोस
ते येईल तेव्हा आणि तसं
त्याला आपलस कर
मग उधळून देईल तेही स्वतःला
तुझ्या सुंदर आयुष्यावर.."
             
     

Wednesday, March 9, 2011

आठवणींची सुरुवात..पण विदारक..

       रविवारची आळसावलेली सकाळ.. सगळ कस आपआपल्या परीने शांत-हळुवार चाललेलं...आठवड्याभराच्या धावपळी नंतर धापा टाकत विसावू पाहणार...
     सहजच घराच्या  खिडकीतून समोरच्या इमारतीकडे पाहिलं आणि ध्यानात आल की त्या इमारतीत कोणाचतरी लग्न होऊ घातलय..किती सुंदर..कोणीतरी आपल्या आयुष्यातल्या  हळुवार- नाजूक पर्वाला सुरुवात करणार होत..
      या कल्पनेने कधीही न पाहिलेल्या त्या 'कोणातरी' साठी उगाचच खूप आनंद झाला आणि त्याला शुभेच्छा देऊन माझ मन मोकळही झाल...
      दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली..वाटलं आता सबंध दिवस मस्त जाईल...तसच झालही...त्याच रविवारची संध्याकाळ...सकाळ प्रमाणे सहजच खिडकीतून समोरच्या  इमारतीकडे पाहिलं...काहीतरी विचित्र घडतंय अस जाणवलं, तोच खाली पोलिसांची गाडी  आणि ambulance दोन्ही दिसल्या..माणसांचा घोळका...कुजबुज आणि काही वेळातच सुन्न करणारी बातमी..
त्याच इमारतीचा चौथ्या मजल्यावर कोणीतरी आत्महत्या केलेय.. 
     त्या घरातून एका आईने आपल्या वासराच्या विरहाने फोडलेला हंबरडा ऐकला आणि क्षणभर बधीर झाल्यासारखं झाल..माझी कोणीही लागत नसलेल्या त्या 'कोणातरी' मुलीसाठी खूप वाईट वाटत होत..त्याहीपेक्षा कित्येक पटीने जास्त तिच्या नातलगांसाठी..आणि अगदीच खर सांगायचं तर 'त्या' मुलीची राग मिश्रित कीव येत होती...
     का करावी आत्महत्या तिने? खरच कारण नाही माहित म्हणजे नंतर अनेक कारण सांगितली लोकांनी..पण खर कारण तर तीच स्वतःसोबत घेवून गेली..
    आयुष्यात कोणीही इतक स्वार्थी कस होवू शकत? आपल्याला आलेलं अपयश, नैराश्य, दुख.. किंवा नकारार्थक  कोणतंही कारण इतक मोठ असू शकत का? की आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारे आई-बाबा भावंडांचा क्षणभरही विचार न करता मृत्यूला कवटाळून घ्याव?...
     जाणारा निघून जातो..स्वतःच्याच प्रेमात, स्वतःच्याच दुखात अखंड बुडालेला की आपल्यावर प्रेम करणार्यांचा साधा विचारही येत नाही का त्यांच्या मनात??
      कुठल्याही गंभीरत गंभीर प्रश्नाचं उत्तर, समस्येचा उपाय "मृत्यू" होऊ शकतो का??
          आत्महत्या करणारा किती सहज स्वतःला संपवून मोकळा होतो..मागे ठेवून जातो अनेक अनुत्तरीत प्रश्न अन दरक्षणी जिवंतपणीच नव्याने "मरण" पाहणारे नातलग...
      

Sunday, March 6, 2011

ब्लॉग लिहिण्यास कारण कि...

शाळेत परीक्षेत मराठीच्या  पेपर मध्ये येणारा हमखास प्रश्न - औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र! मार्क - पुरते आठ..
        आणि मग पत्र लिहिण्यास घेतल्यावर हमखास येणारी ओळ म्हणजे - "पत्र लिहिण्यास करण की..." - तसच काहीस आत्ता मला लिहावास वाटतंय- "ब्लॉग लिहिण्यास कारण की .."
      ... पण पेपर मध्ये पत्र लिहिण्याचे कारण परीक्षकाने आयत दिलेले असायचे...आणि इथे माझा हाच मोठा प्रोब्लेम झालाय...
          स्वतःचा ब्लॉग तयार केला, अगदी पटकन स्वतःची चारोळीही लिहिली... पण नंतर कित्येक दिवस  माझ्या ब्लॉगच पान कोरंच...कारण ब्लॉग लिहिण्याचे कारणच सापडत नव्हत... खरतर आताही मला ते उमजत नाहीय..
          का लिहावा मी ब्लोग? स्वतःसाठी...की दुसऱ्यांनी माझ लिखाण वाचाव यासाठी... बर मी लिहिलेलं इतरांनी का वाचाव? rather ते कोणी वाचेल का??...इथपासून सुरुवात आहे मनात...
          "आयुष्यात आपल्याला अक्कल आलेय" अस मला उगाचच वाटू लागल्यापासून                       माणसांना "माणूस" म्हणून जाणून घेण्याची जी वाईट सवय लागलेय त्या सवयीचे व्यसन कराव अशी इच्छा आहे- म्हणजे माझी आई- आई असण्याआधीही एक माणूस आहे हा विचार डोक्यात सतत असल्याने मला तिला समजण सोपं जात.. हा माझा बऱ्याच वर्षांपासूनचा समज किंवा गैरसमज!
          पण याच माझ्या गैरसमजाला खतपाणी घालून मी मनात जपलेल्या, आयुष्यात भेटलेल्या अनेक माणसांच "माणूसपण" शब्दात मांडण्याचा प्रयोग करावा अस म्हणतेय.. 
        हं...ब्लॉग लिहिण्यास कारण की रोजच्या दिनक्रमात असे अनेक क्षण येतात, माणसं भेटतात की जे नंतर "अनुभव" किंवा त्याहीपेक्षा "आठवण" म्हणून आयुष्यभर पुरतात...
        अशाच अनुभवांची त्याहीपेक्षा आठवणींची साठवण करावीशी वाटतेय म्हणून हा ब्लॉग रुपी अल्बम...
कदाचित त्यातली एखादी आठवण वाचून कोणालातरी वाटून जाईल," अरे मलाही असच काहीस आठवतंय.."
          

Friday, February 4, 2011

Raatricha Anganaat rangto,
Swapn an Aathvancha Lapandaav...
Swapn dolyaant lapayla Aatur,
Pan Dolyaanchi maatr Aathvankade Dhaav...