Wednesday, March 23, 2011





सुखमयी क्षणांची दोन पाखरे
अलगद विसावली खांद्यावर
कुजबुजली हलकेच कानात ,
"भावतं आम्हाला तुझ हास्य ओठांवर..."
          'नेहमी मनभर हसत रहा
          जगण्याच देणं भरभरून लुटत रहा,
          दुःखाचे क्षण  येणारच मार्गी
          त्यांनाही प्रेमाने स्विकारुन पहा..
नकार करणारच पाठलाग तुझा
तू मात्र त्याला घाबरून जाऊ नकोस
त्याच्यापासून  पळण्यापेक्षा 
त्याच्या  समोर धीराने उभी रहा,
           नकारालाही सांग  स्पष्ट 
           मला 'तू' नकोस तर
           तुझा 'होकार' हवा...
सुखाला पैशात मोजू नकोस
सुखाला काळात बांधू नकोस
ते येईल तेव्हा आणि तसं
त्याला आपलस कर
मग उधळून देईल तेही स्वतःला
तुझ्या सुंदर आयुष्यावर.."
             
     

Wednesday, March 9, 2011

आठवणींची सुरुवात..पण विदारक..

       रविवारची आळसावलेली सकाळ.. सगळ कस आपआपल्या परीने शांत-हळुवार चाललेलं...आठवड्याभराच्या धावपळी नंतर धापा टाकत विसावू पाहणार...
     सहजच घराच्या  खिडकीतून समोरच्या इमारतीकडे पाहिलं आणि ध्यानात आल की त्या इमारतीत कोणाचतरी लग्न होऊ घातलय..किती सुंदर..कोणीतरी आपल्या आयुष्यातल्या  हळुवार- नाजूक पर्वाला सुरुवात करणार होत..
      या कल्पनेने कधीही न पाहिलेल्या त्या 'कोणातरी' साठी उगाचच खूप आनंद झाला आणि त्याला शुभेच्छा देऊन माझ मन मोकळही झाल...
      दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली..वाटलं आता सबंध दिवस मस्त जाईल...तसच झालही...त्याच रविवारची संध्याकाळ...सकाळ प्रमाणे सहजच खिडकीतून समोरच्या  इमारतीकडे पाहिलं...काहीतरी विचित्र घडतंय अस जाणवलं, तोच खाली पोलिसांची गाडी  आणि ambulance दोन्ही दिसल्या..माणसांचा घोळका...कुजबुज आणि काही वेळातच सुन्न करणारी बातमी..
त्याच इमारतीचा चौथ्या मजल्यावर कोणीतरी आत्महत्या केलेय.. 
     त्या घरातून एका आईने आपल्या वासराच्या विरहाने फोडलेला हंबरडा ऐकला आणि क्षणभर बधीर झाल्यासारखं झाल..माझी कोणीही लागत नसलेल्या त्या 'कोणातरी' मुलीसाठी खूप वाईट वाटत होत..त्याहीपेक्षा कित्येक पटीने जास्त तिच्या नातलगांसाठी..आणि अगदीच खर सांगायचं तर 'त्या' मुलीची राग मिश्रित कीव येत होती...
     का करावी आत्महत्या तिने? खरच कारण नाही माहित म्हणजे नंतर अनेक कारण सांगितली लोकांनी..पण खर कारण तर तीच स्वतःसोबत घेवून गेली..
    आयुष्यात कोणीही इतक स्वार्थी कस होवू शकत? आपल्याला आलेलं अपयश, नैराश्य, दुख.. किंवा नकारार्थक  कोणतंही कारण इतक मोठ असू शकत का? की आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारे आई-बाबा भावंडांचा क्षणभरही विचार न करता मृत्यूला कवटाळून घ्याव?...
     जाणारा निघून जातो..स्वतःच्याच प्रेमात, स्वतःच्याच दुखात अखंड बुडालेला की आपल्यावर प्रेम करणार्यांचा साधा विचारही येत नाही का त्यांच्या मनात??
      कुठल्याही गंभीरत गंभीर प्रश्नाचं उत्तर, समस्येचा उपाय "मृत्यू" होऊ शकतो का??
          आत्महत्या करणारा किती सहज स्वतःला संपवून मोकळा होतो..मागे ठेवून जातो अनेक अनुत्तरीत प्रश्न अन दरक्षणी जिवंतपणीच नव्याने "मरण" पाहणारे नातलग...
      

Sunday, March 6, 2011

ब्लॉग लिहिण्यास कारण कि...

शाळेत परीक्षेत मराठीच्या  पेपर मध्ये येणारा हमखास प्रश्न - औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र! मार्क - पुरते आठ..
        आणि मग पत्र लिहिण्यास घेतल्यावर हमखास येणारी ओळ म्हणजे - "पत्र लिहिण्यास करण की..." - तसच काहीस आत्ता मला लिहावास वाटतंय- "ब्लॉग लिहिण्यास कारण की .."
      ... पण पेपर मध्ये पत्र लिहिण्याचे कारण परीक्षकाने आयत दिलेले असायचे...आणि इथे माझा हाच मोठा प्रोब्लेम झालाय...
          स्वतःचा ब्लॉग तयार केला, अगदी पटकन स्वतःची चारोळीही लिहिली... पण नंतर कित्येक दिवस  माझ्या ब्लॉगच पान कोरंच...कारण ब्लॉग लिहिण्याचे कारणच सापडत नव्हत... खरतर आताही मला ते उमजत नाहीय..
          का लिहावा मी ब्लोग? स्वतःसाठी...की दुसऱ्यांनी माझ लिखाण वाचाव यासाठी... बर मी लिहिलेलं इतरांनी का वाचाव? rather ते कोणी वाचेल का??...इथपासून सुरुवात आहे मनात...
          "आयुष्यात आपल्याला अक्कल आलेय" अस मला उगाचच वाटू लागल्यापासून                       माणसांना "माणूस" म्हणून जाणून घेण्याची जी वाईट सवय लागलेय त्या सवयीचे व्यसन कराव अशी इच्छा आहे- म्हणजे माझी आई- आई असण्याआधीही एक माणूस आहे हा विचार डोक्यात सतत असल्याने मला तिला समजण सोपं जात.. हा माझा बऱ्याच वर्षांपासूनचा समज किंवा गैरसमज!
          पण याच माझ्या गैरसमजाला खतपाणी घालून मी मनात जपलेल्या, आयुष्यात भेटलेल्या अनेक माणसांच "माणूसपण" शब्दात मांडण्याचा प्रयोग करावा अस म्हणतेय.. 
        हं...ब्लॉग लिहिण्यास कारण की रोजच्या दिनक्रमात असे अनेक क्षण येतात, माणसं भेटतात की जे नंतर "अनुभव" किंवा त्याहीपेक्षा "आठवण" म्हणून आयुष्यभर पुरतात...
        अशाच अनुभवांची त्याहीपेक्षा आठवणींची साठवण करावीशी वाटतेय म्हणून हा ब्लॉग रुपी अल्बम...
कदाचित त्यातली एखादी आठवण वाचून कोणालातरी वाटून जाईल," अरे मलाही असच काहीस आठवतंय.."