Wednesday, March 9, 2011

आठवणींची सुरुवात..पण विदारक..

       रविवारची आळसावलेली सकाळ.. सगळ कस आपआपल्या परीने शांत-हळुवार चाललेलं...आठवड्याभराच्या धावपळी नंतर धापा टाकत विसावू पाहणार...
     सहजच घराच्या  खिडकीतून समोरच्या इमारतीकडे पाहिलं आणि ध्यानात आल की त्या इमारतीत कोणाचतरी लग्न होऊ घातलय..किती सुंदर..कोणीतरी आपल्या आयुष्यातल्या  हळुवार- नाजूक पर्वाला सुरुवात करणार होत..
      या कल्पनेने कधीही न पाहिलेल्या त्या 'कोणातरी' साठी उगाचच खूप आनंद झाला आणि त्याला शुभेच्छा देऊन माझ मन मोकळही झाल...
      दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली..वाटलं आता सबंध दिवस मस्त जाईल...तसच झालही...त्याच रविवारची संध्याकाळ...सकाळ प्रमाणे सहजच खिडकीतून समोरच्या  इमारतीकडे पाहिलं...काहीतरी विचित्र घडतंय अस जाणवलं, तोच खाली पोलिसांची गाडी  आणि ambulance दोन्ही दिसल्या..माणसांचा घोळका...कुजबुज आणि काही वेळातच सुन्न करणारी बातमी..
त्याच इमारतीचा चौथ्या मजल्यावर कोणीतरी आत्महत्या केलेय.. 
     त्या घरातून एका आईने आपल्या वासराच्या विरहाने फोडलेला हंबरडा ऐकला आणि क्षणभर बधीर झाल्यासारखं झाल..माझी कोणीही लागत नसलेल्या त्या 'कोणातरी' मुलीसाठी खूप वाईट वाटत होत..त्याहीपेक्षा कित्येक पटीने जास्त तिच्या नातलगांसाठी..आणि अगदीच खर सांगायचं तर 'त्या' मुलीची राग मिश्रित कीव येत होती...
     का करावी आत्महत्या तिने? खरच कारण नाही माहित म्हणजे नंतर अनेक कारण सांगितली लोकांनी..पण खर कारण तर तीच स्वतःसोबत घेवून गेली..
    आयुष्यात कोणीही इतक स्वार्थी कस होवू शकत? आपल्याला आलेलं अपयश, नैराश्य, दुख.. किंवा नकारार्थक  कोणतंही कारण इतक मोठ असू शकत का? की आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारे आई-बाबा भावंडांचा क्षणभरही विचार न करता मृत्यूला कवटाळून घ्याव?...
     जाणारा निघून जातो..स्वतःच्याच प्रेमात, स्वतःच्याच दुखात अखंड बुडालेला की आपल्यावर प्रेम करणार्यांचा साधा विचारही येत नाही का त्यांच्या मनात??
      कुठल्याही गंभीरत गंभीर प्रश्नाचं उत्तर, समस्येचा उपाय "मृत्यू" होऊ शकतो का??
          आत्महत्या करणारा किती सहज स्वतःला संपवून मोकळा होतो..मागे ठेवून जातो अनेक अनुत्तरीत प्रश्न अन दरक्षणी जिवंतपणीच नव्याने "मरण" पाहणारे नातलग...
      

1 comment:

  1. माणूस स्वार्थी असतो ना, म्हणून करतो तो आत्महत्त्या

    ReplyDelete