Thursday, June 30, 2011

कशासाठी???... पोटासाठी???

    
     संध्याकाळी  साधारण ५.३० -६ ची वेळ …ऑफिसमधून घरी परतण्यासाठी बसमध्ये चढले ..थोड्यावेळातच स्त्रियांकरता राखीव seat वर बसायलाही मिळाले ..driver च्या  मागचीच seat ...१ -२ stop गेले असतील तर पुढच्या दारातून एक गृहस्थ बस मध्ये चढले... अंदाजे वय सांगायचंच झाल तर त्यांनी एव्हाना retire व्हायला पाहिजे होत किंवा ते झालेही असतील...माझ्या शेजारी ते उभे राहिले...
     कोणत्याही पुरुषाने त्यांना बसण्यासाठी जागा दिली  नाही ; अर्थात त्यांनी ती मागितली ही नाही... तसेच एका हातात आपली bag सांभाळत ते उभे होते...मनात असंख्य प्रश्न घेऊन...शरीरात प्रचंड थकवा घेऊन... न राहवून सवयी प्रमाणे मी त्यांना विचारूनच टाकलं..."बसायचं" ???...प्रश्न संपायच्या आत त्यांनी "नाही" सांगून मान फिरवली देखील...मीही मग शांतपणे कधी खिडकीतून बाहेर पाहत तर कधी त्यांचं निरीक्षण करत बसले...पण मनात मात्र अनेक  प्रसंग...आणि प्रश्न यांनी दाटी केली होती...
          प्रवासात असे अनेक लोक दिसतात जे तुम्हा आम्हा सारखेच घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करत असतात...पण फरक एवढाच आपण बहुतेक जण स्वतःच्या इच्छेने हा प्रवास करत असतो....स्वतःसाठी...आणि काही हा प्रवास करत असतात ते त्यांच्याकडे कोणताच पर्याय नसल्यामुळे...पोटासाठी....कुटुंबासाठी...
          का माहित नाही पण अशा माणसांना पाहिलं  की मला माझे बाबा आठवतात...आणि टचकन डोळ्यांत पाणी भरून येत...मी हलकेच पुन्हा त्या गृहस्थांकडे पाहिलं,आता त्यांना बसण्यासाठी जागा मिळाली होती.ते डोळे मिटून बंद करून बसले होते...मी पुन्हा विचारांत गुरफटले गेले...काही दिवसांपूर्वीच असेच एक काका रस्ता ओलांडताना बावरले होते....
           तेव्हाही माझ्या मनात हाच एक प्रश्न आला होता जो आताही येतोय....कशासाठी हे सगळ ???.....घरी बसून आराम करण्याच्या वयात का ही माणस अशी या भयंकर घाईत असलेल्या गर्दीत पळण्याचा प्रयत्न करतात...??? कशासाठी ?? उत्तर एकच...पोटासाठी...
           स्वतःच्याच नाहीतर सबंध कुटुंबाच्या पोटासाठी...सकाळी "आजचा दिवस कसा तरी निभावून ने " अशीच मागणी स्वतःकडे  आणि देवाकडे करत बाहेर पडत असतील असे किती तरी लोक...अंगातला सगळा थकवा बाजूला सारण्याचा किंचित निष्फळ प्रयत्ननात ...अजून थकण्यासाठी...पोटासाठी... 
          घरी बायको नेहमी प्रमाणेच अपेक्षा,चिंता, काळजी, प्रेम, हतबलता या सर्व भावनांचा एकत्रित मार सोसत असेल...सवयीप्रमाणे ... आयुष्यात उमेदीच्या काळात डोळ्यांत रंगवलेल्या स्वप्नांच्या जागी कधी विवंचना भरून राहतात कळतच नाही...आणि मग सुरु होतो जगण्यासाठीचा किचकट प्रवास....माणसांच्या  वाढलेल्या  जंगलात, स्वतःला सावरतानाची होणारी हि नेहमीची कसरत नकोशी वाटत असली तरीही ती नित्यनेमाने करावीच लागते..कशासाठी तर पोटासाठी....
                so called    "Corporate world " च्या व्याखेत ही बसणारे हे लोक रोज नव्याने प्रयत्न करत असतील आपल्या स्वाभिमानी कृतीतून सांगण्याचा कि, "आम्ही ही तुमच्यातलेच आहोत..अजून नाही थकलो आहोत...आम्हाला सहानुभूती  दाखवू नका ...सहकार्य  करा...मागाहून हिणवण्या पेक्षा समोर आल्यावर केवळ अगदी खर  खुर आश्वासक स्मित करा..."
               खरच आयुष्याच्या रहाट गाड्यात  विश्रांतीचे जे काही  क्षण यांच्या वाट्याला येत असतील तेही खर्चाची गोळा बेरीज करण्यातच जात असतील...मुलाच शिक्षण..मुलीचं लग्न..बायकोच दुखण..भावाचा संसार..आई बाबांना आधार...हे सगळाच पहायचं असतं...कितीही दमायला झालं तरीही आयुष्य रेटायच असतं...सगळ्यांना जमेल तितक देत असताना इतरांकडून त्यांची  केवळ अपेक्षा असावी ती म्हणजे त्यांनाही इतरांनी आपल्यात सामावून घेण्याची...
                कदाचित याच भावनेने असेल दररोज रिक्षावाले, बस conductor किंवा रस्ता ओलांडताना भेटलेल्या काकांचा रूपातल्या अश बरयाच लोकांना पाहून अपोआप स्मित उमलत चेहऱ्यावर...त्यना मनोमन सांगणार ..."काका आम्ही ही धावतोय...स्पर्धेत टिकून राहण्यासाठी...आणि पर्यायी तुमच्याच सारख पोटासाठी....