Sunday, September 9, 2012

दुःख

मनाच्या कोपऱ्यात
गुपचूप दडलेलं
कोणाला कळूच नये
म्हणून खोलवर कोंडलेल... दुःख!


        सहनशीलतेचा अंत होऊन
        रागात माखलेलं
        डोळ्यांच्या न्हाणीघरात
        आसवांत न्हालेल... दुःख!


स्वप्न म्हणून कुरवाळलेल
वास्तव म्हणून झिडकारलेल
मोहाच्या सापळ्यात
शिकार होऊन अडकलेल... दुःख!


        घाईने निर्णय घेतलेलं
        निर्णय घेण्यात वेळ दवडलेल
        अव्यक्त, अबोल भावनांनी
        उमलण्या पूर्वीच कोमेजलेल... दुःख!


दूरवर पाहता पाहता
जवळच पाहण राहून गेलेलं
सुखाच्या शोधात फिरताना
हातून सुखच अलगद निसटून गेलेलं ... दुःख!


           अपेक्षेने लादलेल
           नैराश्याने फोफावलेल
           आयुष्य संपवण्याचा
          सोपा मार्ग स्वीकारलेल... दुःख!


दारिद्र्याने गांजलेल
भ्रष्टाचाराने पोखरलेल
अस्तित्वाच्या लढाई मध्ये
क्षणोक्षणी हरलेल... दुःख!


            'आहे कि नाही' या
             प्रश्नाच उत्तर होऊ न शकलेल
             मरण नाही म्हणून जगण्याची
             जखम होऊन बसलेलं... दुःख!


प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल
येताना बहुरूपी झालेलं
जाताना जगण  शिकवलेलं... दुःख!
           

No comments:

Post a Comment