Thursday, July 3, 2014

पाऊस आठवणीतला…
      एकदाच ढगाला पाझर फुटलं… बाल्कनीतून चिल्ल्या-पिल्ल्यांना पावसात भिजताना पाहून लहानपण आठवलं… पूर्वी शाळेला सुट्टी लागली की आमची वारी गावी असायची पार पाऊस सुरु होई पर्यंत गावात राहायचो…धिंगाणा घालयचो… मुंबई पासून अवघ्या साडे तीन तासांवर असणाऱ्या आमच्या गावाने सुदैवाने 'गावपण ' जपलय…. 
    
      मोठी कौलारू घरं… शेणाने सारवलेल्या जमिनी, घरापुढे अंगण, तेही शेणाने सारवून रांगोळीची नक्षी ल्यालेलं… खूप झाडं… शेतातून जाणारी पायवाट… गावाचं राखीव धरण… आणि ज्यामुळे गावाला 'उन्हेरे' अस नाव पडलं,ते गरम पाण्याचे झरे - कुंड….

                                               

      अशा निसर्गरम्य गावातला 'पहिला पाऊस' ही तितकाच निसर्गरम्य… बरेचदा अनुभवलाय तो पण… सोसाट्याचा वारा… वीज कडाडण… ढगांच गडगडण… गावची वीज जाणं आणि आंब्याच्या झाडांवर तग धरून राहिलेले पुरते पिकलेले  आंबे  वाऱ्याने धपाधप पडण… अगदी असाच असायचा पहिला पाऊस… दरवेळी!!
  
                                                                                        
              वारा सुटू लागल्यावर आम्ही लहान मुलं ते परसात पडलेले आंबे वेचण्याच्या निमित्ताने मनसोक्त भिजत असू… अनवाणी पायाने चिखल तुडवत  जास्तीत जास्त आंबे गोळा  करण्याची शर्यत लागायची विनाकारण…  

      आणि अशाच पहिल्या पावसाच्या वेळी दोनदा गारपीट पण अनुभवली… तेव्हाची गारपीट तशी शहाणी होती… ऋतू नुसारच व्हायची… अवकाळी बरसण तिच्या गावी नव्हत म्हणूनच ती सुखदही होती… 

      उन्हाळ्यात गंमत म्हणून आजी - काकू सोबत मेहनतीने  सारवलेल अंगण पावसाच्या सरींनी उखणायच आणि चिखल बनून जायचं तेव्हा कुठेतरी पावसाचा किंचित राग यायचा… अंगण सारावण्याच्या मेहनतीवर खऱ्या अर्थाने 'पाणी फिरवल' म्हणून!                          


      आज त्या लहानग्यांना खड्डे पडलेल्या डांबरी रस्त्यांवर भिजताना पाहून खूप ठळकपणे आठवलं आणि जाणवलं ते स्वतःच निसर्गाच्या खूप जवळ असलेल बालपण! शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि स्वतःच  गाव असलेल्या प्रत्येकाने हा असा पहिला पाऊस नक्कीच अनुभवला असेल… आठवणींच्या कोपऱ्यात जपला असेल… 

  आजोबांसोबत शेतात इवल्या हातांनी राबून त्यांना इवलीशी मदत करणाऱ्या स्वतःला आठवल कि पावसाची माया ध्यानात येते… निसर्गाचा, पहिल्या पावसाचा असा निर्भेळ आनंद किंबहुना 'सुख' अनुभवण्यासाठीच एका निसर्गरम्य गावातल्या शेतकरी कुटुंबात जन्माला घातलं असाव त्याने… वरुणराजाने….